इस्लामाबाद: महागाईने आधीच पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. या महागाईने त्रस्त असलेल्या देशातील नागरिकांना दिलासा देण्याऐवजी तेथील नेते विचित्र सल्ला देत आहेत. पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारमधील पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानातील व्यवहार मंत्री अली इमीन गंडापूर यांनी नुकत्याच एका मेळाव्याला संबोधित करताना लोकांना महागाईपासून वाचण्यासाठी साखर आणि चपात्या कमी खाण्याचा अजब सल्ला दिला आहे.
एका मेळाव्याला संबोधित करताना गंडापूर म्हणाले की, 'मी चहामध्ये शंभर दाणे साखर घातली, मी नऊ कमी दाणे टाकले तर चहाला कमी गोड चव येईल का? आपण खूप कमकुवत झालो आहोत. आपण आपल्या देशासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढींसाठी इतका त्याग करू शकत नाही का? माझा नागरिकांना सल्ला आहे की, महागाईशी सामना करण्यासाठी चपात्या आणि चहात साखर कमी टाकून खा.'
पाकिस्तान सांख्यिकी ब्युरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक 9 टक्के नोंदवला गेला. यातच महागाई वाढल्यामुळे तेथील लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. याबाबत बोलताना गंडापूर म्हणाले की, 'जर 9 टक्के महागाई झाली तर मी माझ्या 100 घासांपैकी नऊ घासांचा त्याग करू शकत नाही का? आता आपल्याला ठरवायचं आहे की, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला काय ठेवायचं आहे.'
पाकिस्तानच्या अर्थ तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेत वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ, पाकिस्तानी रुपयाचे घसरलेले मूल्य आणि सरकारने इंधनासारख्या वस्तूंवर लादलेला कर यामुळे महागाई सतत वाढत आहे. अलीकडेच, पाकिस्तानचे मुख्य विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनीही महागाई वाढल्याचे मान्य केले होते आणि जगात सर्वाधिक महागाई पाकिस्तानमध्ये असल्याचं मान्य केलं होतं.