वॉशिंग्टन - अमेरिका कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला मदत करण्याच्या मूडमध्ये नाहीये. एकीकडे अमेरिका आणि पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत असताना डोनाल्ड ट्रम्प सरकार मात्र पाकिस्तानवर नजर ठेवून आहे. एक वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारकडून पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत रोखण्याची मदत घोषणा केल्यानंतरही पाकिस्तानच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही.
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत दिले होते. गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आणि आमचे (अमेरिकेचे) नेते मूर्ख आहेत, असे समजून त्या बदल्यात त्यांच्याकडून आमच्या वाट्याला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच आली. आता बस्स झाले!, असे आक्रमक स्वरुपाचे ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारलं होतं.