पाकिस्तानमध्ये आता अंधार पसरला आहे, एवढा की पावर प्लांट दुरुस्त करण्यासाठी देखील पैसे नाहीएत. आर्थिक संकट एवढे गडद झालेय की आता लोकांना फक्त दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली आहे. अशातच सौदी अरेबिया, चीनने पाकिस्तानला मदत देण्यापासून हात काढून घेतला आहे. यामुळे पाकिस्तानकडे आता फक्त एकच गोष्ट उरली आहे, ज्याव्दारे पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर पैसे उभारण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तान आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अणुबॉम्ब जगभरातील देशांना विकू शकतो, असे सांगितले जात आहे. जर हे खरे असले तर जे देश सध्या अण्वस्त्रधारी नाहीत ते पाकिस्तानचे मोठे खरेदीदार ठरू शकणार आहेत. यामध्ये सौदी अरेबिया, उत्तर कोरिया सारखे देश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते अहमद अयूब मिर्झा यांनी भारतीय चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याची भीती व्यक्त केली आहे. पाकिस्तान अखेरचा प्रयत्न म्हणून अण्वस्त्रे विकायला काढू शकतो, असे म्हटले आहे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी युरेनियमचा साठा जप्त करण्यात आला होता. यामुळे पाकिस्तान जगातून पैसे गोळा करण्यासाठी आपल्याकडील युरेनियमचा साठ्याची तस्करी करत असल्याचे बोलले जात आहे.
यावर मिर्झा यांनी पाकिस्तानात अण्वस्त्र साठा अजिबात सुरक्षित नसल्याचे वाटतेय असे ते म्हणाले. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने एक वॉचडॉगची नियुक्ती करून पाकिस्तानची शस्त्रास्त्रे ताब्यात घ्यावीत, तसेच सर्व प्रकल्पही ताब्यात घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे, कारण त्यांच्याकडे कोणाचेही नियंत्रण नसलेली अण्वस्त्रे आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले होते. अणुसंपन्न देशात दहशतवाद पसरलेला असल्याने जगासाठी पाकिस्तान आता टेन्शन देणारा देश ठरला आहे. अफगाणिस्तानसारखी परिस्थिती पाकिस्तानात झाली आणि टीटीपीसारख्या दहशतवादी संघटनेच्या हाती अणुबॉम्ब आला तर ते संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरेल, अशी चिंता भारतापासून पाश्चिमात्य देशांपर्यंत आहे. पाकिस्तानकडे 165 आणि भारताकडे 160 अणुबॉम्ब आहेत.