Pakistan On Pok: पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तिथल्या लोकांनी पाकिस्तानातल्या सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु केलं आहे. अशातच आता पाकव्याप्त काश्मीरबाबत वक्तव्य करुन पाकिस्तानने स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारली. पाकिस्तानच्या सरकारी वकिलाने इस्लामाबाद हायकोर्टात धक्कादायक दावा केला, ज्यामुळे पाकिस्तानातील नागरिक संतप्त झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीर ही परकीय भूमी असल्याचे पाकिस्तानने मान्य केले आहे. कोर्टात पाकिस्तानने पीओकेचा भाग नसल्याचे मान्य केल्याने आता सगळीकडे याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर सांगितले की पाकव्याप्त काश्मीर ही परकीय भूमी आहे आणि त्यावर पाकिस्तानचा अधिकार नाही. या विधानाने पाकिस्तानातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणात पाकिस्तानच्या सरकारी वकिलाने शुक्रवारी इस्लामाबाद हायकोर्टात ही कबुली दिली. इस्लामाबाद कोर्टात अहमद फरहाद शाह यांच्या खटल्याची सुनावणी सुरू होती ज्यांचे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी १५ मे रोजी फरहाद यांचे रावळपिंडी येथील घरातून अपहरण केले होते.
कोर्टाने काश्मिरी कवी अहमद फरहाद यांचा शोध घेण्याशी संबंधित खटला रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आणि अधिकाऱ्यांना त्यांना हजर करण्याचे निर्देश दिले होते. पत्नी उरुज झैनब यांनी अहमद फरहाद यांचा शोध घेण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याआधी बुधवारी ॲटर्नी जनरल मन्सूर उस्मान अवान यांनी सांगितले की, कवी अहमद फरहाद यांना अटक करण्यात आली आणि ते पाकव्याप्त काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा पाकिस्तानचे अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांनी न्यायमूर्ती कयानी यांच्यासमोर सांगितले की, फरहाद शाह पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांना इस्लामाबाद हायकोर्टात हजर करता येणार नाही.
"पाकव्याप्त काश्मीर ही एक परकीय भूमी आहे ज्याची स्वतःची घटना आणि स्वतःची न्यायालये आहेत. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी न्यायालयांचे निर्णय परदेशी न्यायालयांच्या निर्णयांसारखे आहेत," असं विधान अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांनी केलं. यावर न्यायमूर्ती कयानी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा परकीय प्रदेश असेल तर पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी रेंजर्स तिथे कसे घुसले? असा सवाल केला.
दरम्यान, पाकव्याप्त काश्मीर हा स्वतंत्र देश असल्याचे पाकिस्तानने म्हटलेले नाही. उलट त्यांनी पाकव्याप्त काश्मीर हा परकीय प्रदेश असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, काश्मीर हा स्वतंत्र नसून इतर देशाचा भाग आहे, असा त्यांचे म्हणणं आहे. मात्र अप्रत्यक्षपणे का होईना, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केल्याचे म्हटलं जात आहे.