पाकिस्ताननंइराणवर स्ट्राईक केल्यानंतर आता इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. इराणने पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करत पाकला तातडीने स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने सूत्राच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. इराणने मंगळवारी पाकिस्तानातील बलूचिस्तान इथं एअरस्ट्राईक केला होता. त्यानंतर दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर या हल्ल्याला पलटवार म्हणून पाकिस्तानने गुरुवारी सकाळी इराणमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन केले. त्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे.
जशास तसं या मार्गाने दोन्ही देश एकमेकांवर वार पलटवार करत आहेत. परंतु ही स्थिती पहिल्यांदाच नाही तर याआधीही इराण आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाल्याचे दिसून आले होते. याबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत म्हटलंय की, आम्ही अनेकदा इराणमधील दहशतवाद्यांबाबत तिथल्या सरकारशी बोललो. परंतु त्यांच्याकडून कुठलीही कारवाई केली नाही. आम्ही ही कारवाई मूळ पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पाकिस्तानविरोधात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले करण्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर केली आहे. सर्व धोके लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
इराणनेही केला एअरस्ट्राईक इराणच्या सरकारी वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी कुहे परिसरात असलेल्या जैश उल अदलच्या दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. ही ठिकाणे मिसाईल आणि ड्रोन हल्ले करून उद्ध्वस्त करण्यात आली. दहशतवादी संघटना जैश उल अदलला आर्मी ऑफ जस्टिस नावानेही ओळखलं जाते. २०१२ मध्ये स्थापन झालेली ही एक सुन्नी दहशतवादी संघटना आहे. जी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातून चालवली जाते. इराणकडून झालेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने इराणला इशारा दिला.
पाकिस्ताननं म्हटलं की, दोन्ही देशात चर्चा सुरू असताना इराणने अशाप्रकारे ही कारवाई केली आहे. इराणने सीमेचे उल्लंघन केले आहे जे स्वीकारलं जाऊ शकत नाही. पाकिस्ताननं इराणच्या परराष्ट खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या हल्ल्याचा कडाडून निषेध केला. हा एकतर्फी हल्ला असून एका चांगल्या शेजारील राष्ट्राच्या संबंधांसाठी योग्य नाही. हा हल्ला एकप्रकारे दोन्ही देशांमधील नाते आणि विश्वास गंभीरदृष्ट्या कमकुवत करू शकतो असं पाकिस्ताननं सांगितले आहे.