इस्लामाबाद: पाकिस्तानात सर्व परिस्थिती आलबेल असल्याचे भासवले जात असले, तरी वास्तवात तसे नाही. पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूपच बिकट होत चालली आहे. तसेच स्थानिक विरोधक इम्रान खान सरकारवर जोरदार टीका करत असून, ते सरकार चालवण्यासाठी धर्माचा मोठ्या प्रमाणात वापर करतायत, असा निशाणा साधत इम्रान खान धार्मिक शोषणकर्ते असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इम्रान खान स्वार्थी दृष्टिकोनातून राजकारण करत आहे. मात्र, यामुळे देशाचे आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. इम्रान खान सरकार आपली अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी धर्माचा आधार घेत आहेत. ही अतिशय गंभीर आणि धक्कादायक बाब आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे.
इम्रान खान यांच्या पक्षातील १५० लोकप्रतिनिधी निलंबित
इम्रान खान यांच्या पक्षातील सुमारे १५० लोकप्रतिनिधींची सदस्यता निलंबित करण्यात आली आहे. गेल्यावर्षीही १५४ लोकप्रतिनिधींची सदस्यता निलंबित करण्यात आली होती. पाकिस्तानमधील निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. सदस्यतेचे विवरण योग्य पद्धतीने सादर न करू शकल्याबाबत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
भिकेला लागल्यावर अक्कल आली
गेली कित्येक दशके काश्मीर, काश्मीर असा जप करत दहशतवाद्यांवर अब्जावधी डॉलर्स उधळणाऱ्या पाकिस्तानला आता भिकेला लागल्यावर अक्कल आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आणि महागाईच्या विळख्यात पुरता कंगाल झालेल्या पाकिस्तानी नेत्यांनी आता परराष्ट्र नीती ठरविली आहे. यामध्ये पाकिस्तान शेजारी देशांशी शांतता आणि आर्थिक कूटनीतीला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, १०० पानांच्या राष्ट्रीय सुरक्षा नीतीमध्ये भारतासोबत काश्मीरमुद्द्यावर अंतिम तोडगा काढत व्यापार आणि व्यवसायीक नात्याला पुढे नेले जाईल. दोन्ही देशांमध्ये दहशतवाद आणि काश्मीरवरून तणाव आहे. यामुळे व्यापारी आणि आर्थिक संबंध खराब झाले आहेत. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने एक्सप्रेस ट्रिब्यूनला मुलाखत देताना म्हटले की, आम्ही पुढील १०० वर्षे तरी भारतासोबर दुष्मनी करणार नाही. ही नवीन नीती शेजारी देशांशी शांतता राखण्यावर आहे. जर काश्मीर मुद्द्यावर चर्चा आणि प्रगती झाली तर भारतासोबत पूर्वीसारखे व्यापारी संबंध होण्याची शक्यता आहे.