ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - भारत - पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाचा फटका पाकिस्तानी कबड्डी संघाला बसला आहे. पाकिस्तानी संघाला कबड्डी वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने हा निर्णय घेतला आहे. या आठवड्यापासून कबड्डी वर्ल्ड कप सुरु होत असून 12 देश यामध्ये सहभागी होणार आहेत.
पाकिस्तानने कबड्डी महासंघाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून आपल्यासोबत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. जर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे तर दोन्ही देशांना बाहेर काढलं पाहिजे असा दावा पाकिस्तानने केला आहे. आमच्याशिवाय कबड्डी वर्ल्ड कप म्हणजे ब्राजीलशिवाय फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्यासारखं आहे असंही पाकिस्तानने म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष देवराज चतुर्वेदी यांनी पाकिस्तानला घेऊन वर्ल्ड कप खेळण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचं सांगितलं आहे. आम्ही भारताचा पराभव करुन वर्ल्ड कप जिंकण्याची आशा होती असं पाकिस्तानी कबड्डी संघाचा कप्तान नासिर अली बोलला आहे.