नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवांनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे कबूल केले आहे. पुलवामा हल्ला पाकिस्तानचे यश आहे, असे सांगत फवाद चौधरी यांनी पुलवामा हल्ल्याचे श्रेय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पार्टी पीटीआयला दिले आहे.
भारताचा पायलट कॅप्टन अभिनंदनला सोडले नाही, तर रात्री ९ वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, असे त्यावेळी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी एका बैठकीत सांगितले होते, असा दावा पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते अयाज सादिक यांनी केला होता. त्यामुळे भीतीने पाकिस्तानने अभिनंदनची सुटका केली अशी टीका इम्रान खान यांच्यावर टीका होऊ लागली. त्या टीकेला उत्तर देताना फवाद चौधरी म्हणाले, पुलवामा हल्ला पाकिस्तानचे यश आहे आणि त्याचे श्रेय इम्रान खान यांना दिले पाहिजे.
दरम्यान, पाकिस्तानचे नेते फवाद चौधरी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांनी अनेकदा भारताविरोधात भाष्य केले आहे. तसेच, फवाद चौधरी यांनी भारताला आण्विक युद्धाची धमकीही दिली होती. चंद्रयान -२ लाँच झाल्यानंतरही त्यांनी वादग्रस्त ट्विट केले. मात्र, या ट्विटनंतर त्यांच्यावर पाकिस्तानमध्येच टीकेची झोड उठली होती.
दरम्यान, गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी २०१९ ला सीआरपीएफच्या ७८ बसेसच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. ७८ बसेसमधून सुमारे २५०० जवान प्रवास करत होते. सीआपीएफच्या ७८ पैकी एका बसला स्फोटकांनी भरलेले चार चाकी वाहन धडकले होते. यामध्ये ४० जवानांना या हल्ल्यात जीव गमवावा लागला. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटेनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.