इस्लामाबाद:पाकिस्तान (Pakistan) आतापर्यंतच्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर आता पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना भारताची मैत्री आठवतीये. शरीफ यांना भारतासोबत चर्चा करायची असून, त्यासाठी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांना मध्यस्थी करण्यासाठी विनंती केली आहे.
UAEला मध्यस्थीचे आवाहनपाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने बुधवारी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शाहबाज शरीफ यांनी यूएईला म्हटले की, तुमचे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. तुम्ही आमचे मुस्लिम बांधव आहात, त्यामुळे आम्हाला मदत करा आणि भारतासोबत आमची चर्चा करुन देण्यास मध्यस्थी करा. या संदर्भात अल अरेबिया वृत्तवाहिनीने पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मुलाखतही दोन भागात प्रसारित केली आहे.
चर्चा होणे महत्वाचेया मुलाखतीचा दुसरा भाग बुधवारी प्रसारित झाला, ज्यामध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. आम्हाला शांतता हवी आहे आणि त्यासाठी गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज म्हणाले. आम्ही यूएईला वचन दिले आहे की, आता पाकिस्तान पूर्ण प्रामाणिकपणे चर्चा करू इच्छितो आणि चांगला परिणाम मिळवू इच्छितो. त्यांनी 12 जानेवारी रोजी अबुधाबीमध्ये शेख अल ननाहयान यांची भेट घेतली.
आम्हाला धडा मिळालाभारतासोबतच्या युद्धांची आठवण करून देताना शरीफ म्हणाले की, आम्ही चांगलाच धडा शिकलो आहोत. आता आम्हाला शांततेत जगायचे आहे, आम्हाला गरिबी संपवायची आहे, आमच्या लोकांना शिक्षण द्यायचे आहे, आरोग्य सुविधा आणि रोजगार द्यायचा आहे. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा संदेश आहे की, आपण बसून काश्मीर वाद आणि इतर समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक चर्चा करू.