कुलभूषण जाधव यांच्याप्रकरणी अखेर पाकिस्तानला झुकावं लागलं आहे. पाकिस्ताननेआंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाच्या (पुनर्विचार) अध्यादेशाला २०२० मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही हायकोर्टात अपील दाखल करता येणार आहे. पाकिस्तानच्या संसदेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयासंबंधी कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरोधात दाद मागण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा मंजूर केला आहे. कुलभूषण सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते.
जाधव (५०) हे भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्याला हेरगिरी आणि दहशतवादाचा दोषी ठरल्यानंतर एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आणि फाशीची शिक्षा नाकारण्याचे आव्हान केले. हेगस्थित आंतरराष्ट्रीय कोर्टाने जुलै २०१९ मध्ये निकाल दिला होता की, पाकिस्तानने जाधव यांच्या दोषी ठरविलेल्या शिक्षेबाबत प्रभावीपणे आढावा घ्या आणि पुनर्विचार करावा आणि त्याचबरोबर भारताला उशीर न करता राजनैतिक प्रवेश द्यावा.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या ४२ पानी आदेशात कुलभूषण जाधव यांना दिलेल्या मृत्यूच्या शिक्षेवर स्थगिती देण्यास सांगितले होते. तसेच याबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले होते. मात्र, पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची आणि जाधव यांना सोडण्याची मागणी पाकिस्तानने मान्य केली नव्हती.