इस्लामाबादः पाकिस्तानात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महागाईची झळ सोसत असलेल्या पाकिस्तानात इम्रान सरकार अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. पहिल्यांदाच 190 रुपये लिटर दूध विकलं जात आहे. आता सफरचंद 400 रुपये किलो, तर संत्रे 360 रुपये किलोनं विकले जात आहे. तर केळे 150 रुपये डझनानं विकली जात आहेत. मटणाची किंमत पाकिस्तानात 1100 रुपये किलो आहे.रमझानच्या महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तू जास्त महाग असतात. त्यामुळे लोक त्रासलेले आहेत. मार्चच्या तुलनेत मेमध्ये कांदा 40 टक्के, टोमॅटो 19 टक्के आमि मुगाची डाळ 13 टक्क्यांहून जास्त किमतीनं विकली जात आहे. साखर, मासे, मसाले, तूप, तांदूळ, पीठ, तेल, चहा, गहू यांच्या किमतीही 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानची जनता महागाईनं त्रासलेली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोक खुलेआम सरकारच्या नीतींना विरोध करत आहेत.बाजाराचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनुसार ऑटो, सिमेंट आणि फार्मास्युटिकल्स सारख्या उद्योगांना लागणाऱ्या कच्चा मालावरच्या आयातीची किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांवर त्याचा भार पडणार आहे. व्यापाऱ्यांचा बाजारावरचा विश्वास उडाला आहे. पाकिस्तानी रुपया मेमध्ये 29 टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. ही आशियातील 13 मुख्य मुद्रांमध्ये सर्वात कमकुवत मुद्रा आहे. एका डॉलरचं मूल्य जवळपास 150 पाकिस्तानी रुपयांएवढं आहे. तर 70 भारतीय रुपये एका डॉलरएवढे आहेत. डॉलरच्या तुलनेत नेपाळी 112 रुपये, बांगलादेश टका 84 आणि अफगाणी मुद्रा 79 आहे.
पाकमध्ये महागाईनं माजला हाहाकार, सफरचंद 400 रुपये, तर संत्रे 360 रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 3:24 PM