पाकिस्तानात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंध प्रांतातील ग्रामीण भागात एका मगरीची हत्या करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी मगरीला कुऱ्हाडीचे वार करून ठार केलं. गावातील एक बकरी मगरीनं खाल्ल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सध्या ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिंध भागातील काही ग्रामस्थांनी मगरीची कुऱ्हाडीचे वार करून हत्या केली. त्यानंतर मगरीला घेऊन तिची विक्री करण्यासाठी ग्रामस्थ दुसऱ्या गावात घेऊन गेले. मगरीनं आपल्या बकरीला जिवंत खाल्ल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. मात्र काही ग्रामस्थांनी दिलेली माहिती वेगळी आहे. परिसरात मगरींची संख्या जास्त आहे. मात्र त्या कधीही जनावरं किंवा माणसांवर हल्ला करत नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.
मगरीनं आमच्या बकरीला मारलं. त्यामुळे आम्ही मगरीला कुऱ्हाडीनं हल्ला करून मारून टाकलं, असं एका ग्रामस्थ पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्स्प्रेस ट्रिब्यूनला सांगितलं. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ग्रामस्थ मगरीला दोरीनं बांधून दुसऱ्या गावात विक्रीसाठी नेताना दिसत आहेत.
मारण्यात आलेल्या मगरीची दुसऱ्या गावात नेऊन विक्री करण्यात येईल. तिथे वास्तव्यास असलेली एक व्यक्ती आम्हाला या बदल्यात बक्षीस देईल, असं मृत मगरीला नेणाऱ्या ग्रामस्थानं सांगितलं. सिंध वन्यजीव विभागाकडून योग्य खबरदारी घेत जात नसल्यानं, कारवाई होत नसल्यानं वन्य प्राण्यांच्या हत्या वाढत असल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं.