पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपले सरकार वाचवण्यासाठी सध्या प्रचंड संघर्ष करत आहेत. सर्वच विरोधी पक्ष सध्या इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर करण्यासाठी जोर लावत आहे. तर दुसरीकडे इम्रान खानही आपले सरकार वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. आता इम्रान खान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर आपल्या बोलण्यात त्यांनी पंतप्रधान मोदींनाही ओढले आहे.
अविश्वास प्रस्तावाचा सामना करत असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, आता स्वत:वर होत असलेल्या हल्ल्यांनंतर फ्रंटफूटवर आले आहेत. विरोधी पक्षांवर ताशेरे ओढताना ते म्हणाले, विरोधी पक्षाचे तीन नेते डाकू आहेत. नवाज शरीफ सत्तेत असताना भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या सेन्याला दहशतवादी म्हटले होते. त्यांच्या 'त्या' वक्तव्याला शरीफ यांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही. इम्रान खैबर पख्तुनख्वा येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
इम्रान खान म्हणाले, "ते मला म्हणत आहेत की, मी त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बंद केली नाहीत, तर ते माझे सरकार पाडतील. पण मीही त्यांना सागू इच्छितो, की मला यासाठी माझा जीवही द्यावा लागला, तरी मी ही प्रकरणे बंद करणार नाही. मी तुमच्या विरोधात राजकारण करत नाही."