इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे परदेशी गुप्त पत्रावरून गोत्यात अडकताना दिसत आहेत. इम्रान खान यांनी ते गुप्त पत्र उघड करावं अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावं आणि हे चिठ्ठी सार्वजनिक करावी अशी मागणी पाकिस्तानात जोर धरू लागली आहे. तर इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे नेते ही चिठ्ठी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मुख्य सरन्यायाधीशांकडे दाखवू शकतात असं म्हटलं आहे.(Pakistan Political Crisis)
याचवेळी पाकिस्तानी सोशल मीडियात इम्रान खान यांच्या गुप्त चिठ्ठीवरून खूप मीम्स व्हायरल होत आहे. पाकिस्तानी राजकीय तज्ज्ञांचा दावा आहे की, इम्रान खान यांनी चिठ्ठीचा दावा करून केवळ एक राजकीय डाव खेळला असेल. इस्लामाबाद येथील रॅलीत कागदाचा तुकडा दाखवत इम्रान खान यांनी त्यांचे सरकार पाडण्यासाठी परदेशी शक्तींचा हात असल्याचे त्यांच्याकडे पुरावे आहेत असा दावा केला होता.
पाकिस्तानी मीडिया एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याच्या आंतरराष्ट्रीय कटाचा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही. खरेतर, हे पत्र पाकिस्तानच्या परदेशी धोरणांचं मूल्याकन केल्याचा अहवाल आहे असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांचा दावा आहे की, धमकीचे पत्र लष्करी नेतृत्वालाही शेअर केले होते. पण अशा कोणत्याही कटाची माहिती नाही आणि कोणताही पुरावा त्यांनी पाहिला नाही असं संबंधित पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे.
सत्य असतं तर आतापर्यंत कारवाई झाली असती
रिपोर्टनुसार, पाकिस्तानला परदेशी धोक्यांशी निगडीत विभागातील एका सूत्राने सांगितले की, जर कोणताही धोका असता तर आतापर्यंत काही कारवाई केली गेली असती, परंतु अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जर धोका इतका गंभीर असेल तर राष्ट्रीय सुरक्षा समितीची (NSC) बैठक तातडीने का बोलावण्यात आली नाही. पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयातील काही अधिकारी नाराज आहेत की जर कट खरा असेल तर तो पंतप्रधानांनी जाहीरपणे उठवण्यापेक्षा संबंधित कार्यालयाकडे मांडायला हवा होता असं त्यांनी सांगितले.
इम्रान खान यांच्यावर शपथभंगाचा आरोप
हा मुद्दा जाहीरपणे उपस्थित करून इम्रान खान यांनी आपल्या घटनात्मक शपथेचे उल्लंघन केले आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. अशा तपशीलांचे सार्वजनिक करण्याची परवानगी नाही. दरम्यान, पाकिस्तानचे फेडरल मंत्री असद उमर यांनी सांगितले की, इम्रान खान हे पत्र पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अत्ता बंदियाल यांना दाखवण्यास तयार आहेत. इस्लामाबादमध्ये माहिती मंत्री फवाद चौधरी यांच्यासमवेत नियोजन आणि विकास मंत्री उमर म्हणाले की, आम्ही स्वतः पत्र पाहिले आहे, कोणाला काही शंका असल्यास पंतप्रधान तयार आहेत. त्यांना वाटते की, आपण सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर ते दाखवू शकतो असं त्यांनी सांगितले.