इस्लामाबाद :पाकिस्तानात कोरोनाने हात-पाय पसरले आहेत. यातच आता पंतप्रधानइम्रान खान यांच्यासंदर्भात मोठी बातमी आली आहे. येथील एक सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध एधी फाउंडेशनचे प्रमुख फैसल एधी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना इस्लामाबाद येथील एका रुग्णालयात आयसोलेट करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील एक वृत्त वाहिनी जीईओने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच एधी यांनी पंतप्रधानइम्रान खान यांची भेट घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मदत म्हणून सामाजिक कार्यकर्ते फैसल एधी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना एक चेक दिला होता. मात्र, आता फैसल एधी यांना कोरोनाची लागण झाल्याने पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही कोरोनाचे संकट घोंघावत आहे.
फैसल एधी हे प्रसिद्ध समाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांचे पुत्र आहेत. गेल्या 15 एप्रिलला एधी आणि इम्रान खान यांची भेट झाल्याचे समजते. यावेळी एधी यांनी कोरोना रिलीफ फंडासाठी 1 कोटी रुपयांचा चेक दिल्याचे समजते. हा चेक त्यांनी इम्रान खान यांच्या हातात दिला होता. मात्र आता ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत येथे 8 हजार 418 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर 176 जणांचा कोरनामुळे मृत्यू झाला असून 1 हजार 970 जण बरे होऊन घरी गेले आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.