भारताविरोधात गरळ ओकून पाकिस्तानचे पंतप्रधान झालेल्या इम्रान खान यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. विरोधी पक्षांनी २८ मार्चला त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची घोषणा केली आहे, त्यातच दोन दिवसांपूर्वी आपण हस्तक्षेप करणार नाही असा शब्द देणाऱ्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांनी अचानक शब्द फिरविला आहे. पुढच्या दोन दिवसांत राजीनामा देण्याचे आदेश लष्कराने इम्रान खान यांना दिले आहेत.
इम्रान खान यांच्या निरोपाची तारीख पाकिस्तानी सैन्याने ठरविली आहे. उद्या २२ आणि २३ मार्चला ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनची बैठक होणार आहे. ही बैठक झाली की लगेचच राजीनामा द्यावा, असे आदेश लष्कराने खान यांना दिले आहेत. हे आदेश कमर जावेद बाजवा यांच्याच सांगण्यावरून आल्याचा दावा केला जात आहे. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानी मीडियानुसार इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटविण्याचा निर्णय बाजवा आणि अन्य तीन लेफ्टनंट जनरलनी घेतला आहे. इम्रान खान यांची बाजवा आणि नदीम अंजुम यांनी भेट घेतली होती. या बैठकीतच इम्रान यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे समजते आहे.
पाकिसातान तहरीक ए इंसाफचे काही खासदार देखील फुटले आहेत. यामुळे अविश्वास प्रस्तावावेळी ते विरोधात मतदान करतील. इम्रान खान यांना माजी लष्कर प्रमुख राहिल शरीफ मदत करतील अशी अपेक्षा होती. शरीफ बाजवांना भेटण्यासाठी गेले होते. यानंतर शुक्रवारी देखील इम्रान खान बाजवांच्या भेटीला गेले होते. परंतू यामध्ये काहीच हाती लागले नाही.
विरोधक दोन पर्यायांवर विचार करत असल्याचे समजत आहे. एक म्हणजे पाकिस्तान मुस्लिम लीगने (नवाझ) शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करावे आणि सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात. दुसरा पर्याय म्हणजे पाच वर्षांसाठी राष्ट्रीय सरकार स्थापन करणे, कारण पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परंतू, शाहबाज यांचे बंधू आणि निर्वासित नेते नवाझ शरीफ हे लवकरात लवकर निवडणुकां घेण्याच्या बाजूने असल्याचे समजते. यामुळे दुसरा पर्याय विचारात घेतला जाणार नसल्याचे समजते.