रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर तेथे मृत्यूचे तांडव सुरू आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोला पोहोचले आहे. तेथे त्यांनी असे काही वक्तव्य केले, की, ज्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विमानतळावर स्वागत करणाऱ्या रशियन शिष्टमंडळाला इम्रान म्हणाले, व्वा, काय वेळ आहे, आपण अगदी योग्य वेळी येथे आलो आहोत. मी खूप उत्सुक आहे. या हल्ल्यानंतर रशियाला भेट देणारे इम्रान खान हे पहिले राष्ट्र प्रमुख आहेत.
दुसरीकडे, इम्रान खान यांच्या दोन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर अमेरिकेने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. रशियाच्या युक्रेनवरील कारवाईवर प्रश्न उपस्थित करणे, ही प्रत्येक जबाबदार देशाची जबाबदारी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिकेने युक्रेनच्या स्थितीवर पाकिस्तानला आपल्या स्थितीसंदर्भात अवगत करून दिले आहे. प्राइस म्हणाले, युक्रेनसोबत असलेले आपले सहकार्य अमेरिका आपल्या हितांसाठी महत्वाचे मानते.
इम्रान खान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपल्या बैठकीत ऊर्जा सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. इस्लामोफोबिया आणि तालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानातील परिस्थितीसह, इतरही मुख्य प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील.