इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी अटक करण्यासाठी पाकिस्तानचे पोलिस रविवारी त्यांच्या घरी पोहोचले, परंतु त्यापूर्वीच ते गायब झाले होते. अटक करणे हा मुळीच उद्देश नव्हता. अशी सारवासारव पोलिसांनी केली. एवढे झाल्यानंतर काही तासांनी इम्रान समर्थकांसमोर आले आणि त्यांनी सरकारचा आपली हत्या करण्याचा कट होता असा गंभीर आरोप केला.
इम्रान खान ७ मार्च रोजी न्यायालयात हजर होतील असे त्यांच्या कायदेशीर पथकाने आश्वासन दिल्यानंतर पोलीस त्यांच्या निवासस्थानावरून परतले. इम्रान खान यांनी जमान पार्कमधील एका खोलीत स्वत:ला बंद करून घेतले. पोलीस जेव्हा नोटीस देण्यासाठी आले तेव्हा ते घरी नव्हते; पण पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते त्यांच्या घरातून हजर झाले हाेते, असा दावा खान यांचे कर्मचारी पथकाचे प्रमुख शिबली फराज तरार यांनी केला.
इम्रान यांची टीकाइम्रान खान यांनी ट्वीट करून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्यावर हल्लाबोल केला. ज्या देशामध्ये बदमाशांना राज्य चालवायला दिले जाते त्या देशाचे भविष्य काय असेल? शाहबाज शरीफ ८ अब्ज रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि १६ अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरणार होते. त्यामुळेच जनरल बाजवा यांनी सुनावणी पुढे ढकलून त्यांना पंतप्रधान केले, असा आरोप त्यांनी केला.
‘तोशाखाना’तील वस्तू विकल्यासत्ताधारी पाकिस्तानी लोकशाही चळवळीने तोशाखाना भेटवस्तू प्रकरण निवडणूक आयोगाकडे उचलले होते. इम्रान यांनी आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला. परंतु या भेटवस्तू तोशाखान्यातून (सरकारी तिजोरी) २.१५ कोटी रुपयांना विकत घेतल्या आणि त्याच्या विक्रीतून ५.८ कोटी रुपये मिळाल्याचा दावा इम्रान यांनी निवडणूक आयोगाकडे केला होता. नंतर ही रक्कम २० कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले होते.
कायदा सर्वांना समानइस्लामाबाद पोलिसांनी ट्वीट केले होते की, इस्लामाबाद पोलिस संरक्षणात खान यांना इस्लामाबादला स्थानांतरित करतील. कायदा सर्वांसाठी समान आहे. अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. खान यांच्याविराेधात २८ तारखेला अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यात आला हाेता.