इस्लामाबाद - गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान सरकारवरील संकट, हा संपूर्ण जगासाठी चर्चेचा विषय झाला आहे. अम्रान सरकार धोक्यात आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या नजरा पाकिस्तानकडे वळल्या आहेत. अशा स्थितीत सध्या पाकिस्तान सरकार अल्पमतात आहे आणि 3 एप्रिलला तेथे फ्लोर टेस्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. यातच आता, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा इम्रान खान यांच्या घरी पोहोचले आहेत. बाजवा आणि इम्रान यांच्या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. तसेच, या बैठकीनंतर इम्रान खान सायंकाळपर्यंत राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा पाकिस्तानी माध्यमांत सुरू आहे.
'अविश्वास प्रस्ताव म्हणजे परकीय षड्यंत्र' -अशातच, इम्रान यांनी एक मोठी खेळी करून पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ते याला सातत्याने परकीय षडयंत्र म्हणत आपल्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर आपण यासंदर्भात लवकरच खुलासा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फ्लोअर टेस्टपूर्वीच मोठा झटका -पाकिस्तानातील काही माध्यमांतील वृत्तांनुसार, इम्रान बुधवारी सायंकाळी पाकिस्तानी जनतेला संबोधित करू शकतात. अशा स्थितीत त्यांचे मंत्री फवाद चौधरी यांनी ते राजीनामा देणार नाहीत, असे सांगितले आहे. मात्र, ते आणीबाणीसारखा काही निर्णय घेऊ शकतात, अशीही चर्चा आहे. यातच, एमक्यूएमच्या 2 मंत्र्यांनी इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत बाहेर पडले आहेत. एमक्यूएम हा इम्रान खान यांच्या सरकारमधील मित्रपक्ष होता. मात्र आता बुधवारीच त्याने विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली आहे.
किती मतांनी कोसळणार सरकार?पाकिस्तान विधानसभेत एकूण 342 सदस्य आहेत. अशा स्थितीत इम्रान यांना बहुमतासाठी 172 सदस्यांची गरज आहे. मात्र एमक्यूएमने इम्रान खान यांची साथ सोडल्यानंतर आता विरोधकांकडे 177 सदस्यांचा पाठिंबा असेल. तर इम्रान खान यांच्याकडे केवळ 164 सदस्यच शिल्लक आहेत.