इस्लामाबाद- भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटीनं पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली एक तातडीची बैठक बोलावली. बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लष्कर आणि नागरिकांना कोणत्याही परिस्थितीला समोरं जाण्यासाठी तयार राहा, असा सल्ला दिला आहे. तसेच आता वेळ आणि स्थळ पाकिस्तान ठरवेल; अशी धमकीही इम्रान खान यांनी भारताला दिली आहे.भारतीय वायुसेनेच्या मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई सर्जिकल स्ट्राइक 2च्या नावानं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही भारताला धमकी दिली आहे.भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या बालाकोट येथील बहुतांशी दहशवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे.भारतीय हवाई दलाच्या मिराज2000’ची 12 लढाऊ विमानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. त्यावेळी मोदी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचं पूर्ण मोहिमेवर लक्ष होतं. बालाकोटमध्ये जवळपास 3.45 वाजता, मुजफ्फराबादमध्ये 3.48 वाजता, तर चाकोटीमध्ये 3.58मध्ये प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला आहे.
कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा, इम्रान खान यांचं पाकिस्तानी नागरिकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 4:22 PM