पाकिस्तान आता आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कधीही तोल ढळू शकतो, आणि अराजकता पैदा होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी ज्याच्यामुळे पाकिस्तान भिकेला लागला त्या काश्मीरचा राग आळवायचे काही कमी होत नाहीय. जनतेत उद्रेक वाढला की लगेचच काश्मीरवर बोलायचे आणि लोकांचे लक्ष तिकडे वळवायचे, या कित्येक वर्षांपासूनच्या सूत्रावर शाहबाज शरीफ आले आहेत.
इम्रान खान यांनीदेखील पंतप्रधान पदावर येण्यासाठी भारताचाच आधार घेतला होता. परंतू आता पद गेल्यावर भारताविरोधात चकार शब्दही काढत नाहीएत. उलट भारताची स्तुती करत आहे. असे असताना शुक्रवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने आर्टिकल ३७० चा निर्णय रद्द करावा असे म्हटले आहे.
शुक्रवारी शरीफ यांनी पाकिस्तानला संबोधित केले. यावेळी त्यांनी काश्मीरचा विषय काढलाच. आशिया खंडात जर शांतता नांदायची असेल तर ५ ऑगस्ट २०१९ मध्ये घेतलेला एकतर्फी निर्णय संपविण्याची भारताची जबाबदारी आहे. यामुळे जम्मू-काश्मीरचा प्रश्न चर्चेतून सोडविला जाऊ शकेल, असे ते म्हणाले.
पाकिस्तानात गुरुवारी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत ३० रुपयांची वाढ करण्यात आली. पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी इंधनाच्या दरात वाढ करणे गरजेचे होते, असे शरीफ म्हणाले. या पाकिस्तानने काश्मीरवरून भारतात दहशतवाद पसरविण्यासाठी करोडो डॉलर्स दहशतवादावर खर्च केले आहेत. परदेशी मदतीतून येणारा पैसा देखील यासाठी खर्च करण्यात आला होता. आता पाकिस्तानकडे इंधनालाच नाही तर अन्न धान्य खरेदीसाठी देखील पैसा उरलेला नाही.