पाकिस्तानला पुराचा मोठा फटका बसला आहे. निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे येथील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत दुःख व्यक्त केले होते. या ट्विटमध्ये, पाकिस्तानात पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःखी आहे, असे मोदींनी म्हटले होते. यावर पाकिस्तानचे पंतप्रधाना शहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
शहबाज शरीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरामुळे झालेल्या मानवी आणि भौतिक नुकसानीबद्दल शोक व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. पाकिस्तानातील लोक, इंशाअल्लाह, या नैसर्गिक संकटावर मात करतील आणि पुन्हा आपल्या जीवन सुरळित करतील.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? -पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी ट्विट केले होते, की पाकिस्तानात पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या, जखमी झालेल्या तसेच बाधितांच्या कुटुंबियांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि लवकरात लवकर सामान्य स्थिती निर्माण होईल, अशी आशा करतो.
जवळपास 1100 जणांचा मृत्यू -पाकिस्तानात आलेल्यापुरामुळे मरणारांचा आकडा जवळपास 1,100 वर पोहोचला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे. या पुराच्या थैमानामुळे पाकिस्तानातील जवळपास 3 कोटी 30 लाख लोक विस्थापित झाले आहेत.