इस्लामाबाद - पाकिस्तानात पोलीस प्रशासनाचे सर्वच अधिकारी एका कुत्र्याला शोधत आहेत. गुजरांवाला शहराचे पोलीस अयुक्त जुल्फिकार घुमन यांचा कुत्रा मंगळवारी बेपत्ता झाला. यानंतर त्यांनी आपल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी राज्याच्या यंत्रणेलाच कामाला लावले आहे. आता पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी ऑटो रिक्शावर लाउडस्पीकर लावून कुत्रा बेपत्ता झाल्याची अनाउन्समेंट करत आहेत आणि घरो-घरी जाऊन त्याचा शोधही घेत आहेत. एवढेच नाही, तर कुणाच्या घरात हा कुत्रा आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देत आहेत. (Pakistan police commissioner deploys state machinery to search his missing dog)
गुजराणवाला शहराचे आयुक्त झुल्फिकार घुमन यांनी कुत्रा बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविली आणि 'घर-घर शोध' घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यानंतर कारवाई सुरू झाली. रिपोर्टनुसार स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय कर्मचार्यांना त्यांच्या ऑफिशिअल ड्युटीवरून दूर करत, कुत्र्याला शोधण्याच्या कामात लावण्यात आले आहे.
कुत्र्याची किंमत सांगितली जातेय 4 लाख रुपये -माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, या कुत्र्याची किंमत चार लाख रुपये सांगण्यात येत आहे. मात्र हा कुत्रा नेमक्या कोणत्या जातीचा आहे यासंदर्भात अद्याप खुलासा झालेला नाही. कुत्रा बेपत्ता झाल्यानंतर आयुक्तांच्या हाऊस केअरटेकर्सना त्याच्या दुर्लक्षामुळे फटकारण्यात आले असून एका कर्मचाऱ्यालाही कामावरून काढण्यात आल्याचे वृत्त आहे.
सोशल मिडियावर आयुक्त ट्रोल -या संपूर्ण प्रकारावरून संबंधित आयुक्तांना सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानातील सोशल मिडिया युझर्स या घटनेवरून आयुक्तांची खिल्ली उडवत आहेत. एवढेच नाही, तर राज्याच्या यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही लोक सोशल मीडियावर करत आहेत. एका व्यक्तीने तर, चोर आणि दरोडेखोरांना पकडण्याऐवजी पोलीस कुत्र्याचा शोध घेत आहेत, असा टोमणाही लगावला आहे.