पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांवर गोळीबार केल्याचीही माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात शुक्रवारी मोठ्या संख्येने काश्मिरी लोक रस्त्यावर उतरले. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, वाढती महागाई, कर आणि विजेचा तुटवडा यामुळे ही निदर्शने करण्यात येत आहे. जनता आणि सुरक्षादलाचे कर्मचारी यांच्यात झालेल्या चकमकीत एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे.
पीओकेच्या लोकांनी शनिवारी, 11 मे रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना आखली होती, परंतु एक दिवस आधी, मुझफ्फराबादमध्ये अतिरिक्त पोलीस दल बोलावून लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली, त्यानंतर लोकांचा रोष आणखी वाढला. याशिवाय दादियाल, मीरपूर आणि समाहनी, रावळकोटसह पीओकेच्या इतर भागांत चकमक झाल्याची माहिती मिळत आहे.
70 हून अधिक जणांना अटक
रिपोर्टनुसार, पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यात 70 हून अधिक लोकांना अटक केली. यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर आला. अटकेच्या निषेधार्थ, सामान्य जनतेने सुरक्षा दलांवर दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. रिपोर्टनुसार, परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्यासाठी जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने शुक्रवारी संप पुकारला होता. यामध्ये वाहतूकदारांच्या संपाचाही समावेश होता. इस्लामाबाद सरकार करारांची पूर्तता करत नसल्याचा आरोप समितीने केला आहे. मुझफ्फराबादमधील संपादरम्यान पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या आणि हवेत गोळ्या झाडाव्या लागल्या.
कर्जाच्या जाळ्यात अडकला पाकिस्तान
पाकिस्तानी लोक महागाईशी झुंजत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर करताना कठोर अटी घातल्या होत्या, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. विजेचे दर वाढल्याने अडचणी वाढल्या असून पाकिस्तानातील लोकांना रस्त्यावर उतरावे लागले आहे.