इस्लामाबाद:पाकिस्तानातील राजकीय वादळ थांबण्याचे नाव घेत नाहीये, आणि यातच आता पंतप्रधान इम्रान खान यांचे सहकारी फवाद चौधरी यांनी नवा वाद निर्माण केला आहे. फवाद चौधरी यांचा बुधवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी जोरदार वाद झाला. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पत्रकारांचा 'भाडोत्री' असा उल्लेख करत पैसे घेतल्याचा आरोप केला.
'तुम्ही भाडोत्री आहात...'पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाबाहेर फवाद चौदरी यांची पत्रकार परिषद सुरू होती. यावेळी पत्रकार फवाद यांना प्रश्न विचारत होते, पण फवाद चौधरी अचानक भडकले आणि त्यांनी पत्रकारांचा भाडोत्री असा उल्लेख करत पैसे घेतल्याचा आरोप केला. यानंतर एक पत्रकार पुढे आले आणि फवाद चौधरी यांनाच भाडोत्री म्हटले. यानंतर एका बाजुला पत्रकार आणि दुसऱ्या बाजुला फवाद चौधरी असा गोंधळ पाहायला मिळाला.
फवाद चौधरीविरोधात घोषणाबाजी फवाद चौधरी यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी गोंधळ सुरू केला आणि फवाद चौधरी यांनाही माफी मागण्यास सांगितले, मात्र त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आणि फवाद चौधरीविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी फवाद चौधरी यांच्यासोबत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचा (पीटीआय) आणखी एक नेता उपस्थित होता.
फवाद चौधरी पत्रकारांवर का चिडले?पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी फवाद चौधरीला फराह खान देशातून कशी पळाली असा प्रश्न विचारला. त्यामुळेच फवाद चौधरी संतापले. फराह खान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबीची जवळची मैत्रीण आहे. ती देश सोडून पळून गेली आहे. फराह खान 90 हजार डॉलर घेऊन पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तिचा विमानात बसल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे.