पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात 3 एप्रिल रोजी संसदेत अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे, असा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी मंगळवारी केला आहे. पाकिस्तानच्या संसदेत सोमवारी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावर 31 मार्च रोजी चर्चा होणार आहे.
गृहमंत्री शेख रशीद म्हणाले, "3 एप्रिलच्या शेवटच्या तासापर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल. पाकिस्तानच्या राजकारणाचा सामना मजेशीर टप्प्यात पोहोचत आहे. इम्रान खान शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार आहेत." दरम्यान, इम्रान खान यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला विरोधी पक्षांच्या 161 खासदारांनी पाठिंबा दिला. मात्र, इम्रान खान यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याच पक्षाचे आणि मित्रपक्ष एमक्यूएम-पी (MQM-P) आणि पीएमएल-क्यूचे (PML-Q) अनेक खासदारही त्यांच्या विरोधात जाऊ शकतात.
पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी दावा केला आहे की, इम्रान खान धमकीची पत्रे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना देण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, इम्रान खान यांनी रॅलीदरम्यान एक पत्र दाखवताना दावा केला होता की, त्यांना बाहेरील सैन्याकडून धमकीची पत्रे मिळाली आहेत. इम्रान खान यांनी दावा केला होता की, पत्रात त्यांना भूमिका बदलण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत आणि तसे न केल्यास त्यांना सत्तेतून बेदखल केले जाईल असे म्हटले आहे. यावर फवाद चौधरी म्हणाले, "जर हे खरे असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना धमक्या येत आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे."
नंबर गेममध्ये अडकले आहेत इम्रान खान...इम्रान खान नंबर गेममध्ये अडकले आहेत. पाकिस्तानच्या संसदेत एकूण 342 सदस्य आहेत, त्यापैकी सत्तेत राहण्यासाठी 172 सदस्यांची गरज आहे. इम्रान यांना 179 सदस्यांचा पाठिंबा होता, त्यापैकी 51 बंडखोर झाले आहेत. आता इम्रान खान यांना पाठिंबा देणारे 128 सदस्य आहेत, म्हणजेच बहुमतापेक्षा 44 कमी आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे 162 सदस्य होते, यामध्ये जर 51 अधिक जोडले तर त्याचा आकडा 213 पर्यंत वाढतो, म्हणजे बहुमतापेक्षा 41 अधिक. त्यामुळे बंडखोर सदस्य विरोधकांसोबत गेले तर विरोधक सरकार स्थापन करू शकतात.