कराची – गेल्या महिनाभरापासून पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा अंतिम निकाल लागला आहे. पीएमएल-एन प्रमुख शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील. शरीफ यांनी १७४ मते घेऊन इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार शाह मोहम्मद कुरैशी यांना मात दिली आहे. संसदेत मतदानापूर्वी इम्रान खान यांच्या पक्षातील सर्व खासदारांनी राजीनामा देत सभागृहाचा त्याग केला. शनिवारी रात्री इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला होता तेव्हापासून देशातील नव्या पंतप्रधानांबाबत चर्चा सुरू होती.
सोमवारी सभागृह सुरू झाले तेव्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. तर इम्रान खान यांच्या तहरिक ए इंसाफ पार्टीकडून मोहम्मद कुरैशी हे पंतप्रधानपदासाठी उभे राहिले. त्यात शाहबाज शरीफ यांनी बाजी मारत पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवला आहे. शाहबाज शरीफ रात्री ८ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी हे शाहबाज शरीफ यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील.
संसदेत शाहबाज शरीफ यांच्या विजयानंतर विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांच्या सांगण्यावरून शाहबाज शरीफ हे आघाडी पक्षातील खासदारांसोबत सत्ताधारी पक्षाच्या खुर्चीवर येऊन बसले. इम्रान खान यांच्या पक्षातील उमेदवाराला एकही मत मिळाले नाही. मतदानापूर्वी पीटीआयच्या सर्व खासदारांनी राजीनामा देण्याची घोषणा करत सभागृहात बहिष्कार टाकला.
अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडणारे इम्रान खान हे पहिलेच
- ३४२ सदस्यसंख्या असलेल्या कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी १७२ मतांची गरज होती.
- मतदानावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली.
- अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडावे लागणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदान टाळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत अनेक प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना अपयश आले.
- १८ ऑगस्ट २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर इम्रान खान पंतप्रधानपदी आले. त्यांचे सरकार ३ वर्षे ७ महिने २३ चालले. अविश्वास प्रस्तावावर १२ तासहून अधिक वेळ चर्चा झाली.
नव्या सरकारकडे केवळ ५ महिने
पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहात ३४२ एवढे संख्याबळ आहे. नव्या पंतप्रधानाला १७२ मते मिळविणे आवश्यक आहे. नव्या सरकारच्या हाती केवळ ५ महिनेच राहणार असून ऑगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.