पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संघर्षात पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची जाण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाआधीच इम्रान खान राजीनामा देतील अशी चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी दुपारी कॅबिनेटची आपत्कालीन बैठक बोलावली होती. सरकार पाडण्याच्या कटात परदेशी शक्तींचा हात असल्याचा पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा आहे. पंतप्रधान म्हणून इम्रान खान सरकारला ३ वर्ष १० महिने झाले आहेत. पाकिस्तानात कार्यकाळ पूर्ण होण्याआधी पंतप्रधान पायउतार झाल्याची पहिलीच घटना नाही. आतापर्यंत पाकिस्तानात जितके पंतप्रधान झालेत त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही.
आता पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील पंतप्रधान कोण याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात शाहबाज शरीफ हे नाव आघाडीवर आहेत. शरीफ हे पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान असतील असं बोललं जात आहे. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. शरीफ यांच्या घरी हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान बनण्यासाठीच्या जय्यत तयारीही सुरू झाली आहे. २०१८ च्या निवडणुकीत शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले होते. मात्र त्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाचा विजय झाला. त्यामुळे शाहबाज शरीफ यांचे पंतप्रधान बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले.
शाहबाज शरीफ हे पाकिस्तानी मुस्लीम लीग एनचे नेते आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आहेत. ते कुशल प्रशासक म्हणूनही ओळखले जातात. सध्या ते पाकिस्तानात विरोधी पक्षनेते आहेत. अनेक मुद्द्यांवर शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान सरकारला कोंडीत पकडले होते. ते ३ वेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. १९९७ मध्ये पहिल्यांदा ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते. १९५१ मध्ये लाहोरमध्ये शाहबाज शरीफ यांचा जन्म झाला.
भारतातून पाकिस्तान स्थलांतरीत झाले कुटुंब
शाहबाज शरीफ यांचे वडील मुहम्मद शरीफ व्यावसायिक होते. त्यांची आई पुलवामा येथे राहणारी आहे. व्यावसायिक कामासाठी ते नेहमी काश्मीरला येऊन जाऊन होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब पंजाबच्या अमृतसर येथे वास्तव्यास होते. ब्रिटीश काळात १९४७ मध्ये जेव्हा भारत-पाकिस्तानची फाळणी झाली. जेव्हा मुहम्मद शरीफ कुटुंबासह लाहोर येथे राहण्यास गेले. नवाज शरीफ, अब्बास शरीफ असे दोघं भाऊ आहेत. शाहबाजने १९७३ मध्ये स्वत:च्या बहिणीशी लग्न केले. त्यांना ४ मुले आहेत. २००३ मध्ये शाहबाज शरीफ यांनी दुसरं लग्न केले.