आसिफ अली झरदारी हे पुन्हा एकदा पाकिस्तानचे राष्ट्रपती होत आहेत. मात्र, फार कमी लोकांना माहीत असेल की, ते रोज एका काळ्या बकऱ्याची 'कुर्बानी' अथवा बळी देत होते. हो हे खरे आहे. ते जेव्हा 2008 मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले होते, तेव्हा त्यांच्या घरी रोज काळा बकरा आणला जात होता.
काळ्या जादूपासून आणि वाईट नजरेपासून वाचण्यासाठी ते असे करत होते. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने 2010 मध्ये या संदर्भात एक वृत्तही प्रकाशित केले होते. तेव्हा जगभरात त्याची जबरदस्त चर्चा झाली होती. त्यावेळी झरदारी यांच्या इस्लामाबादमधील घरी रोज एका काळ्या बकऱ्याचा बळी दिला जात होता.
पाकिस्तानात सर्व काही व्यवस्थित राहिल्यास, शहबाज शरीफ पंतप्रधान, तर आसिफ अली झरदारी दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्रपती होतील. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थात PPP यांच्यात आघाडी सरकार स्थापन करण्यासंदर्भात सहमती झाली आहे. झरदारी यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यानंतर, 2010 च्या त्या वृत्तासंदर्भातही चर्चा सुरू झाली आहे. तत्कालीन प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी यासंदर्भात पुष्टी करत, राष्ट्रपती 'सादिका' करतात. याेत एखाद्या प्राण्याचा बळी देऊन त्याचे मांस गरिबांमध्ये वाटले जाते.
तेव्हा बाबर यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटले होते की, मी हे सर्व होताना बघितले आहे. रोज तर नाही, मात्र ते अनेक वेळा असे करतात. अल्लाहला खूश करणे हा या मागचा उद्देश आहे. वाईट गोष्टी घडू नयेत, अशीही कामना केली जाते. झरदारी यांच्या पत्नी बेनझीर भुट्टे यांनी 2007 मध्ये पाकिस्तानात परतल्यानंतर सादिका सुरू केल्याचेही खुद्द बाबर यांनी सांगितले होते. यानंतर काही महिन्यांनी बेनझीर यांचा आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला होता.