लंडन : कलम 370 रद्द केल्याने काश्मीर मुद्द्यावरून भारतपाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्ताननेभारताला युद्धाची धमकीही देऊन टाकली आहे. अशातच पाकिस्तानच्या एका पक्षाच्या नेत्याने भारताचे गुणगाण गाणारे गाणे म्हणत सोशल मिडीयावर खळबळ उडवून दिली आहे.
पाकिस्तानमध्ये 'मुत्ताहिदा क़ौमी मूवमेंट' (MQM) या पक्षाचे नेते आणि संस्थापक अल्ताफ हुसैन यांनी चक्क टेबल वाजवत 'सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा' हे गाणे गायले आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये राहणाऱ्या हुसैन यांनी सांगितले होते, की काश्मीरच्या जनतेने पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान सरकारवर विश्वास ठेवू नये. पाकिस्तान सरकारी आणि त्यांचे सैन्य गेल्या 72 वर्षांपासून काश्मीरच्या लोकांना फसवत आहेत.
याच हुसैन यांनी 2016 मध्ये एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानला जगाचा कॅन्सर असल्याची उपमा दिली होती. यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानने कारवाई केली होती. हुसैन यांनी नेहमी भारत पाकिस्तानदरम्यानचा कटूपणा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे त्यांच्यावर भारताला मदत करण्याचा आरोप केला होता. अल्ताफ हुसैन हे कराचीचे मोठे नेते आहेत. शहराच्या राजकारणावर त्यांची आजही चांगली पकड आहे. मात्र, त्यांना पाकिस्तानने हद्दपार केले आहे. यामुळे ते सध्या लंडनमध्ये राहत आहेत.