दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानातून उतरताना पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा अपघात झाला आहे,त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. बुधवारी रात्री ही घटना घडली, मात्र गुरुवारी (३१ ऑक्टोबर) रात्री उशिरा त्यांच्या कार्यालयाने याची माहिती दिली.
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पडल्यानंतर आसिफ अली झरदारी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांच्या पायाला प्लास्टर लावले. चार आठवडे त्यांच्या पायावर प्लास्टर राहील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, अध्यक्ष झरदारी यांना घरी पाठवण्यात आले असून त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
६९ वर्षीय आसिफ अली झरदारी यांना अलिकडच्या वर्षांत अनेक आरोग्यविषयक अडचणी आल्या. संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. २०२२ मध्ये, छातीच्या संसर्गाच्या उपचारांसाठी त्यांना कराचीतील डॉक्टर झियाउद्दीन रुग्णालयात आठवडाभर दाखल करण्यात आले होते. त्या काळात प्रकृती अस्वास्थ्याच्या अफवांदरम्यान, त्यांचे वैयक्तिक चिकित्सक आणि जवळचे सहकारी डॉ असीम हुसेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पुष्टी केली की त्यांची प्रकृती चांगली आहे.