इस्लामाबाद : पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या जयंतीनिमित्त करण्यासाठी आपण तयार केलेल्या भाषणाचा लेखी तर्जुमा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसैन यांच्या कार्यालयाने चोरून दुसऱ्या व्यक्तीस दिला, असा आरोप करणारी याचिका एका शालेय विद्यार्थ्याने इस्लामाबाद उच्च न्यायालयात केली आहे.‘दि एक्स्प्रेस ट्रिब्युन’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुहम्मद सबील हैदर या विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांच्या मार्फत केलेल्या या याचिकेवर शुक्रवारी प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर न्या. आमेर फारूख यांनी त्यावरील निकाल राखून ठेवला. आपण तयार केलेल्या भाषणाची लेखी प्रत राष्ट्राध्यक्ष कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘चोरली’ व ती दुसऱ्या शाळेतील आयेशा इश्तियाक नावाच्या दुसऱ्या मुलीस दिली व तिने आपले भाषण स्वत:चे म्हणून ठोकून दिले, असा सबील हैदर याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)भाषणाची ‘चोरी’ कशी झाली ?- या विद्यार्थ्याच्या वकिलाने न्यायालयास सांगितले की, गेल्या मार्चमध्ये राष्ट्रपती कार्यालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सबील हैदरने जिन्न्ना यांंच्या जीवनावर भाषण केले होते. राष्ट्रपतींना ते आवडले व त्यांनी तसे प्रशस्तीपत्रही दिले. जिन्ना यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्राध्यक्ष कार्यालयातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात ‘पाकिस्तान का मुस्तकबिल’ या विषयावर सबीलने भाषण करावे, अशी विनंती राष्ट्रपती कार्यालयाने केली. त्या भाषणाचे रेकॉर्डिंंग २३ डिसेंबर रोजी व्हायचे होते. सबीलने सत्र परिक्षेचे दोन पेपर बुडवून भाषणाची जय्यत तयारी केली व रेकॉर्डिंगसाठी तो अध्यक्षीय प्रासादात पोहोचला. तेथे अधिकाऱ्यांनी त्याच्या भाषणाची एक प्रत मंजूर करून घेण्यासाठी मागून घेतली व सबीलला रेकॉडिंगच्या आधी मेक-अप करण्यासाठी पाठविले. मेक-अप करून आल्यावर सबील भाषणसाठी आपला नंबर येण्याची वाट पाहात बसला असताना त्याने तयार केलेले भाषण आयेशा या दुसऱ्याच मुलीने केले.राष्ट्रपती कार्यालयाकडून आपली बौद्धिक संपदा चोरली गेली व ‘कॉपीराईट’चा भंग केला गेल्याने आयेशाने केलेले आपले चोरलेले भाषण इलेक्ट्रॉनिक अथवा समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यास मनाई करावी, अशी या विद्यार्थ्याची विनंती आहे.
पाक राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने भाषण ‘चोरल्या’चा आरोप
By admin | Published: December 25, 2016 12:57 AM