इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान सरकारची तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, असे असतानाही पंतप्रधान इम्रान खान वादातच आहेत. आता, बलात्कारासाठी मोबाईल जबाबदार असल्याचे वक्तव्य केल्याने पाकिस्तानातील ट्विटर युझर्सनी त्यांना ट्रोल केले आहे. यापूर्वी, इम्रान खान यांनी लैंगिक अत्याचारासाठी छोट्या कपड्यांना जबाबदार धरले होते. इम्रान यांना ट्रोल करताना, ते खऱ्या गुन्हेगारांना आणि प्रशासनाला सोडून सर्वांवरच खापर फोडत आहे, असे लोक म्हणत आहेत.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी, मिनार-ए-पाकिस्तान येथे काही मवाल्यांनी एका टिकटॉकर तरुणीची छेड काढली होती. एवढेच नाही, तर त्या तरुणीचे कपडेही फाडण्यात आले होते. यासंदर्भात इम्रान खान यांनी गुरुवारी दुःखही व्यक्त केले. एवढेच नाही, तर ही घटना लज्जास्पद आहे, अशा घटना पाकिस्तानच्या संस्कृती आणि धर्मात नाहीत, असेही ते म्हणाले होते. तथापि, यावेळी त्यांनी, महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी मोबाईलचा गैरवापर जबाबदार असल्याचेही म्हटले होते.
इम्रान म्हणाले, ''आपल्या देशात पूर्वी महिलांचा जेवढा आदर केला जात होता, तेवढा जगात कुठेही दिसत नव्हता. पाश्चिमात्य देशांतही महिलांचा तेवढा आदर होत नव्हता, जेवढा आपल्याकडे होत होता.'' इम्रान म्हणाले, मुलांवर योग्य प्रकारे संस्कार होत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मोबाइलवर खापर फोडताना, मोबाइलच्या दुरुपयोगामुळेच लैंगिक गुन्हा वाढत आहेत, असेही इम्रान म्हणाले.''
ट्विटर युझर्सनी इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच, ते खऱ्या दोषींना सोडून इतरांना दोष देऊ शकतात.
एका ट्विटर युझरने लिहिले आहे, की "लहान कपड्यांना दोष द्या, मोबाईल फोनला दोष द्या, रोबोटला दोष द्या, पण पुरुषांना कधीही दोष देऊ नका."
यापूर्वी इम्रान खान यांनी, महिलांच्या छोट्या कपड्यांना लैंगिक हिंसाचारासाठी जबाबदार धरत, अशा कपड्यांमुळे पुरुष उत्तेजित होतात, असे म्हणाले होते.