इस्लामाबादः पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान खान पोहोचले असून, त्यांनी तिथल्या संसदेला संबोधितही केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते फक्त काश्मीरवर थांबणारे नाहीत, लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्येही घुसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पुलवामानंतर भारतानं बालाकोटची मोहीम आखली होती. त्याप्रमाणेच आता ते लवकरच पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठीही प्रयत्न करतील.भारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध झाल्यास त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल. पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा हा जगातल्या प्रत्येक स्तरावर उपस्थित करत राहील. गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ, येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येणार आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असेल, तर दुसरीकडे पाकिस्तान विरोध प्रदर्शन करेल. पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर सैरभैर झालेला असून, त्यांनी पुन्हा एकदा भाषणातून भारताला लक्ष्य केलं आहे.
बिथरलेल्या पाकची युद्धाची दर्पोक्ती; म्हणे, PoK वाचवण्यासाठी मोदी सरकारशी शेवटपर्यंत लढू!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 4:45 PM