पाकिस्तानातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले आहे. इम्रान म्हणाले, भारत हा अमेरिकेसोबत क्वाडचा (क्वाड) सदस्य आहे, असे असतानाही तो रशियाकडून तेल आयात करत आहे. हे भारताचे परराष्ट्र धोरण आहे. मी आज भारताचे कौतुक करतो, की ते नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरणावर पुढे जात आहेत.
इम्रान म्हणाले, भारत आणि अमेरिका यांची चांगली मैत्री आहे आणि ते स्वतःला तटस्थ म्हणवतात. एवढेच नाही तर, निर्बंध असतानाही भारत रशियाकडून तेल मागवत आहे. कारण भारताचे परराष्ट्र धोरण जनतेच्या भल्यासाठी आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानात राजकीय उलथापालथ -पाकिस्तानचे राजकारण पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये आजपर्यंत एकाही पंतप्रधानाला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही आणि आता इम्रान खान यांना सत्तेवरून खाली खेचण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहेत.
येत्या 28 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव होणार आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्याच पक्षाचे अनेक खासदार त्यांच्या विरोधात असल्याने इम्रान या मतदानाला भीत आहेत. असंतुष्ट खासदार इस्लामाबाद येथील सिंध हाऊसमध्ये थांबलेले आहेत.