इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये आपल्या भाषणादरम्यान दहशतवादी ओसामा बिन लादेनचा उल्लेख 'शहीद' असा केला आहे. ओसामा बिन लादेन हा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा नेता होता. तसेच, अमेरिकेतील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंडही होता.
पंतप्रधान इम्रान खान आपल्या भाषणात म्हणाले, " आम्हाला खूप वाईट वाटले होते, ज्यावेळी अमेरिकेने एबटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला ठार मारले... तो शहीद झाला."
ओसामा बिन लादेनने 2001 मध्ये अमेरिकेवर 9/11 चा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास 3000 अमेरिकन लोकांना आपला जीव गमवावा लागला. यूएस नेव्ही सील्सने 2011 मध्ये लष्करी कारवाईत ओसामा बिन लादेनला ठार केले होते. अमेरिकन सैन्याने पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये जाऊन ही कारवाई केली होती.
दरम्यान, ओसामा बिन लादेनबाबत इम्रान खान यांचे हे पहिलेच विधान नाही. यापूर्वी एका टीव्ही मुलाखतीतही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेनला दहशतवादी म्हणण्यास नकार दिला होता. इम्रान खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे उदाहरण देऊन म्हटले होते की, ते ब्रिटनसाठी अतिरेकी आणि इतरांसाठी स्वातंत्र्यसैनिक होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान इम्रान खान म्हणाले होते की, पाकिस्तानने अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सींना एबटाबादमध्ये ओसामा बिन लादेनच्या उपस्थितीबद्दल माहिती दिली होती. मात्र, अमेरिकेने पाकिस्तानला अंधारात ठेवून ओसामा बिन लादेनला ठार करायला नको होते, असे इम्रान खान म्हणाले होते.
अमेरिकन सैन्य दलांनी 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता. अल-कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारून 9/11 च्या हल्ल्याचा बदला घेतला होता. अमेरिकन कमांडोनी पाकिस्तानच्या छावणीत घुसून ओसामा बिन लादेनला ठार केले होते. हे पाकिस्तानला सुद्धा माहीत नव्हते.
जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे चेअरमन अॅडमिरल माइक मुलेन यांनी पाकिस्तानचे जनरल कियानी यांना बोलावून सांगितले, तेव्हा पाकिस्तानला ओसामा बिन लादेनच्या मृत्यूबद्दल कळले. या कारवाईनंतर ओसामा बिन लादेनला आश्रय देण्याच्या भूमिकेबाबत पाकिस्तान सतत नकार देत होता.
आणखी बातम्या...
कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार
ठाकरे मंत्रिमंडळाने घेतले 12 महत्त्वाचे निर्णय; वस्तू व सेवाकर अधिनियमात मोठी सुधारणा
शेतकऱ्याची कमाल! पिकवले अनोखे 'कलिंगड', बाहेरून 'हिरवे' अन् आतून 'पिवळे'
आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर