इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांची गेल्या आठवड्यात अमेरिकेत विमानतळावर झडती घेण्यात आली. युट्यूबवर असलेल्या व्हिडिओमध्ये अब्बासी हे न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावर सुरक्षा तपासणीतून गेल्यानंतर कोट घालण्यापूर्वी टी शर्ट व्यवस्थित करताना दिसतात.त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटली आहे. अमेरिकेने राजशिष्टाचाराचे पालन केले नाही. पंतप्रधान खासगी दौऱ्यावर गेले तरी त्यांचा पासपोर्ट राजनैतिक असतो. त्यामुळे त्यांची तपासणी करणे, कपडे काढायला लावणे चुकीचे आहे, अशी टीका पाकिस्तानच्या टीव्ही चॅनल्सनी केल्याने पाकिस्तानात अमेरिकेविरोधी वातावरण तयार झाले आहे.अब्बासी अमेरिकेत त्यांच्या आजारी बहिणीला पाहण्यासाठी खासगी भेटीवर आले होते. विमानतळावर अब्बासी यांना सामान्य प्रवाशासारखे तुच्छ लेखले गेले. अब्बासी यांची सुरक्षेसाठीच्या तपासणीत झडती घेतली गेली, असे व्हिडिओमध्ये दिसले. अब्बासी हे अण्वस्त्रधारी देश पाकिस्तानचे पंतप्रधान असतानाही सरकारी प्रथा बाजूला ठेवली गेली. त्यांची ट्रॉली बॅग आणि जॅकेटची तपासणी सुरक्षेसाठी झाल्यानंतर अब्बासी हे तेथून बाहेर पडताना त्यांचा टी शर्ट व्यवस्थित करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.या महिन्यात अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी अब्बासी यांना पाकने तालिबान व इतर अतिरेक्यांविरोधात कारवाई केलीच पाहिजे, असे म्हटले होते. तालिबान, हक्कानी नेटवर्कमधील अतिरेक्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली होती.आजवर अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलर्सचे साह्य दिले पण त्या मोबदल्यात आमचे नेते मूर्ख आहेत, असे समजूनपाकिस्तानने फसवणुकीशिवाय काहीही दिले नाही, असे ट्रम्प यांनी टिष्ट्वटरवर म्हटल्यापासून पाकिस्तान व अमेरिकेचे संबंध तणावाचे झाले. या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने या दोन्ही देशांमधील दुरावा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पाकच्या पंतप्रधानांचे कपडे काढून झडती, अमेरिकेत विमानतळावर सुरक्षा तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 3:57 AM