Pakistan Imran Khan, CM Amin Ali Gandapur missing: भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये सध्या अंतर्गत कलह सुरु आहे. गेल्या एक वर्षापासून तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. याचदरम्यान, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर हे बेपत्ता झाल्याचा आश्चर्यकारक दावा करण्यात आला आहे. त्यांनी शनिवारी इस्लामाबादमधील डी चौकात पोहोचण्याचे साऱ्यांना आवाहन केले होते, पण आता तेच बेपत्ता झाल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
पीटीआय पक्षाने सीएम अली अमीन गंडापूर बेपत्ता झाल्यानंतरही इम्रान खानच्या सुटकेच्या समर्थनार्थ आंदोलन सुरूच ठेवले. पक्षाने रात्री बैठक घेतली. जोपर्यंत इम्रान खान हे निदर्शने संपवण्याचा आदेश देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री गंडापूर बेपत्ता असल्याचा दावा
पाकिस्तानी मीडियानुसार, एकीकडे पक्षाने मुख्यमंत्री गंडापूर बेपत्ता झाल्याचा दावा केला. दुसरीकडे, पक्षाचे म्हणणे आहे की जर मुख्यमंत्र्यांना अटक झाली, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम स्वाती आंदोलनाचे नेतृत्व करतील आणि जर स्वाती यांना अटक झाली, तर नवीन नेत्याची निवड केली जाईल. सीएम गंडापूर बेपत्ता झाल्याची टीका राजकीय समितीने केली. मुख्यमंत्र्यांना अटक केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही समितीने दिला.
पाकिस्तानात गोंधळ, राखीव सैन्य तैनात
पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांनी आंदोलन पुकारले होते. माजी पंतप्रधान गेल्या एक वर्षापासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत. याआधीही इम्रान खानच्या सुटकेच्या मागणीसाठी देशात निदर्शने झाली आहेत. मात्र, इम्रान खान यांच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांमुळे सरकारने इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये ५ ते १७ ऑक्टोबरपर्यंत लष्कर तैनात केले आहे.