काबूल - अफगाणिस्तानमध्ये येत्या 28 सप्टेंबरला राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. यादरम्यान अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार अमरुल्लाह सलेह यांनी दहशतवादी संघटना इसिसचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तान आयएसआयएस दहशतवाद्यांना फंडिंग करतं याचे सख्त पुरावे अफगाणिस्तानकडे आहेत असं त्यांनी सांगितले आहे.
अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि माजी गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख राहिलेले अमरुल्लाह सलेह यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे. अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले की, काबुलमध्ये अलीकडेच एका आयएसआयएसआयच्या दहशतवाद्याला पकडले. त्याच्या चौकशीदरम्यान या गोष्टीसमोर आल्या आहेत. पाकिस्तान आयएसआयएस फंडिंग करते असं चौकशीतून समोर आलं आहे. दहशत पसरविण्यासाठी त्यांना पाकिस्तानकडून हत्यारं पुरविण्यात येतात. याचे पुरावे आमच्याकडे आहेत असं अमरुल्लाह यांनी सांगितले.
तसेच अमरुल्लाह सलेह यांनी भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. अफगाणिस्तान याचे भारतासोबत चांगले संबंध असल्याने पाकिस्तान त्याचा राग अफगाणिस्तानवर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत भाग आहे. त्यामुळे कलम 370 हटविण्याचा निर्णय भारताचा अंतर्गत मामला आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानला आक्षेप घेण्याची गरज नव्हती. तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा प्रश्न घेऊन जाण्याला अर्थ नाही असा टोला सलेह यांनी पाकिस्तानला लगावला आहे.
पाकिस्तान काश्मीर मुद्दा अफगाणिस्तानशी जोडत आहे त्याचा आम्ही विरोध करतो. सैरभैर झालेला पाकिस्तान अफगाणिस्तानशी बदला घेण्याची भाषा करतो यालाच दहशतवाद म्हणतात. दहशतवादाचा रस्ता सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी तालिबानला ऑफर दिली मात्र त्यांनी इन्कार केला आहे. कारण त्यांना माहिती आहे की, दहशतवादी निवडणूक लढवू शकत नाही अन् कोणतीही जागा जिंकू शकत नाहीत. त्यामुळे तालिबानला सक्रीय राजकारणात आणणे कठिण असल्याचं अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले. त्याचबरोबर अफगाणिस्तान भारताला खरा मित्र मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अफगाणिस्तानशी आणखी चांगले संबंध व्हावेत अशीच इच्छा आहे. भारतासोबतची मैत्री आणखी मजबूत व्हावी असंही अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले.