Pakistan Sanam Javed, PTI: पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ म्हणजे पीटीआय पक्षाच्या नेत्या सनम जावेद खान या ९ मे रोजी घडलेल्या दंगलीप्रकरणी कोट लखपत तुरुंगात होत्या. त्यांची नुकतीच सुटका झाली होती. पण अवघ्या एका तासात त्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली. पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना ९ मे रोजी अटक केल्यानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि जिना हाऊसवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सनम बराच काळ तुरुंगात होत्या. सनम जावेद यांना इस्लामाबाद न्यायालयाने फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दाखल केलेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले. त्यांची सुटका झाल्यानंतर अवघ्या तासाभरात सनम यांना इस्लामाबाद पोलिसांनी पुन्हा अटक केल्याचे सांगितले.
सनम जावेद यांना नव्या प्रकरणात अटक
गेल्या आठवड्यात लाहोर हायकोर्टाने दंगलीशी संबंधित एका खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. FIA च्या पथकाने त्यांना एका नवीन प्रकरणात अटक केली. मात्र, सनम यांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्यांना पुन्हा किती काळासाठी अटक झाली आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. सनम यांच्या वकिलाने अटकेची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
सनम जावेद यांच्यावर आरोप काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी जिना हाऊसवर हल्ला करण्यासाठी प्रक्षोभक पोस्ट केल्याप्रकरणी FIA सायबर क्राईम सेलने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर सनम यांना अटक झाली. याव्यतिरिक्त त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर जमान पार्कमध्ये तोडफोड, पीएमएल-एन हाऊसमध्ये जाळपोळ आणि रेसकोर्स पोलीस ठाण्यातील घटनेचा समावेश असलेले एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.