इस्लामाबाद: पुलवामा हल्ल्याच्या 5 दिवसांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेशी संवाद साधला. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय भारताकडून पाकिस्तानवर आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी भाषणात केला. हल्ल्याचे पुरावे द्या, चौकशीला सहकार्य करतो, असंदेखील इम्रान म्हणाले. भारतानं आक्रमण केल्यास पाकिस्तानदेखील चोख प्रत्युत्तर देईल, अशा इशारादेखील खान यांनी दिला. यानंतर आता खान यांचे मंत्रीदेखील भारताविरोधात आगलावी भाषणं करु लागले आहेत. भारतानं शांततेची बोलणी केली, तर आम्हीदेखील शांततेविषयी बोलू. मात्र त्यांनी युद्धाची भाषा केली, तर आम्हीदेखील त्याच भाषेत उत्तर देऊ, असं पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद म्हणाले. इम्रान खान यांनी 20 कोटी पाकिस्तानी जनतेच्या वतीनं भाषण केलं. पाकिस्ताननं हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्यासाठी पाकिस्तान म्हणजे जीवन आहे आणि पाकिस्तान म्हणजेच मरण आहे. पाकिस्तानकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं, तर त्याचे डोळे काढून घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली.
युद्ध झालं तर मंदिरांमधला घंटानाद बंद होईल; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 7:48 PM