पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर एक भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक जखमी झाले. आता या स्फोटाचे एक धडकी भरवणारे व्हिडीओ समोर आले आहेत. स्पुतनिक इंडियाने X वर या बॉम्बस्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर केला आहे.
बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलिसांचे पथक या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलं असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रेल्वे स्टेशनच्या बुकिंग ऑफिसमध्ये हा स्फोट झाला. घटनास्थळी मृतदेहांचा खच पडलेला दिसत आहे.
स्फोटामुळे प्लॅटफॉर्मच्या छतालाही तडे गेले असून स्फोटाचा आवाज शहरातील विविध भागात दूरपर्यंत ऐकू आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि हे निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणारं भयानक कृत्य असल्याचं म्हटलं. तसेच तपासाचे आदेश दिले आहेत.
बलुचिस्तानचे पोलीस महानिरीक्षक मौझम जाह अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बॉम्बशोधक पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून घटनेचा रिपोर्ट मागवला आहे.