इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आज सकाळी या आरोपीला सुळावर चढवण्यात आलं. दोषी आरोपीचं नाव इम्रान अली असून, त्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. न्यायाधीश आदिल सरवर यांनी बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांसमोरच आरोपी इम्रान अलीला फाशी दिली आहे. तसेच त्याचा मृतदेह अर्धा तास लटकलेल्या अवस्थेत होता.मंगळवारी आरोपीला स्वतःच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी त्याला फाशी दिली. इम्रान अलीला जानेवारीमध्ये पोलिसांनी अटक केली होती. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयात(एटीसी) वेगवेगळ्या प्रकरणात 21 खून प्रकरणातही त्याच्यावर आरोप होते. तसेच इम्राननं आतापर्यंत 9 मुलींवर बलात्कार केला असून, त्यात या 7 वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून त्यानं तिच्यावर बलात्कार केला होता.9 जानेवारी 2018ला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता. त्यानंतर पूर्ण पाकिस्तानमध्ये विरोध प्रदर्शन करण्यात आलं होतं. प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातही गेलं. तेव्हा न्यायालयानं तीन दिवसांत आरोपीला अटक करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते. कालांतरानं आरोपीला अटक करण्यात आली. माझ्यासमोरच त्याला सुळावर चढवल्यानं मी समाधानी आहे, असं पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं आहे.
पाकिस्तानमध्ये बलात्काऱ्याला मुलीच्या वडिलांसमोरच दिली फाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 1:47 PM