इस्लामाबाद - भारत सरकारने कलम 370 हटवल्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानने या प्रश्नावरून जागतिक पातळीवर रान पेटवण्याचा प्रयत्न केला होता. भारताला युद्धाचीही धमकी दिली होती. मात्र हे सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता पाकिस्तान काश्मीर प्रश्न पुन्हा चर्चेच्या टेबलावर आणण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला भारतोसोबत चर्चा करण्यात काहीच हरकत नसल्याचे म्हटले आहे. मात्र पाकिस्तान आणि भारत यांच्यातील काश्मीरबाबतच्या द्विपक्षीय चर्चेत काश्मीर हा तिसरा पक्ष आहे. त्यामुळे काश्मिरी नेत्यांची भेट घेण्याची परवानगी मिळावी, अशी अट त्यांनी घातली आहे. शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानने चर्चेसाठी कधीही नकार दिलेला नाही. तसेच द्विपक्षीय चर्चेत कुणी तिसरा पक्ष मध्यस्थी करणार असेल तर त्याचेही आम्ही स्वागतच करू. मात्र भारताच्या बाजूने चर्चेसाठी अनुकूल वातावरण दिसत नाही. तसेच काश्मीरप्रश्नी तीन पक्ष आहेत. भारत-पाकिस्तान आणि काश्मीर. त्यामुळे चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नजरकैदेत असलेल्या काश्मिरी नेत्यांना मुक्त करावे.''
काश्मीरप्रश्नावरून पाकिस्तान भारतासोबत चर्चेस तयार, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 4:08 PM