इस्लामाबाद : पाकिस्तान आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 30 भारतीय कैद्यांची मुक्तता करणार आहे. भारतीय कैद्यांमध्ये 27 मच्छीमारांचा समावेश आहे.
मानवतावादी विषयांमध्ये राजकारण नको, अशी पाकिस्तानची भूमिका असल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. याबाबतची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली. यावेळी मोहम्मद फैसल म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की, भारताकडून सुद्धा अशा प्रकारे विचार करण्यात येईल'.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानचे मच्छीमार अनेकदा दिशा भरकटल्याने एकमेकांच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशाच्या सागरी सीमेमध्ये प्रवेश करतात. अशाप्रकारे अनावधानाने सीमा ओलांडून आलेल्या मच्छीमारांना अटक करुन बराच काळ कैदी म्हणून तुरुंगात ठेवले जाते.