नवी दिल्ली - हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना जाळ्यात अडकवण्यासाठी आणि भारताची बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न पाकिस्तान करत आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा छेडछाड केलेला अजून एक व्हिडीओ रिलीज केला आहे. या व्हिडीओत कुलभूषण जाधव आपली आई आणि पत्नी भेटायला आली तेव्हा भारतीय राजनियक जे पी सिंग त्यांच्यावर ओरडत होते असा दावा करताना दिसत आहे.
'माझी भेट झाल्यानंतर भारतीय राजनियक माझ्या आई आणि पत्नीवर ओरडत का होते ?', असा प्रश्न कुलभूषण जाधव व्हिडीओत विचारताना दिसत आहेत. पुढे ते बोलले आहेत की, 'भेटीदरम्यान माझ्या आईला मारहाण करुन आणण्यात आलं असं वाटत होतं'. आपण आपल्या आईच्या डोळ्यात भीती पाहिल्याचं कुलभूषण जाधव व्हिडीओत सांगत आहेत. तसंच आपण गुप्तहेर खात्यात काम करत नव्हतो अशी खोटी माहिती भारत का देत आहे ? असा प्रश्नही ते विचारत आहेत.
'मला भारताला सांगायचं आहे की, मी भारतीय नौदलातील अधिकारी आहे. तुम्ही माझ्याबद्दल पाकिस्तानला खोटी माहिती का देत आहात ?', असं कुलभूषण जाधव बोलताना दिसत आहेत.
भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधवांवर भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे एजंट असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. जाधव यांना 3 मार्च 2016ला पाकिस्ताननं बलुचिस्तानमधून अटक केली होती. पाकिस्तानी आर्मी अॅक्ट(PAA)अंतर्गत हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत फील्ड जनरल कोर्ट मार्शल(FGCM)नुसार त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्ताननं जाधवांवर विध्वंसक हालचाली केल्याचा ठपका ठेवला आहे.
व्हिडीओत पुढे बोलताना कुलभूषण जाधव यांनी आपण आपल्या आईला भेटून आनंदी असल्याचं सांगितलं आहे. 'तुला भेटून मला आता खूप बरं वाटत आहे असं आई बोलली', असं ते सांगत आहेत. तसंच पाकिस्तानने धमकावलेलं नसून, या व्हिडीओत कोणतीबी छेडछाड केली नसल्याचंही ते बोलत आहेत.
25 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीने पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक वाद निर्माण झाले होते. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला बांगड्या, टिकली आणि मंगळसूत्र काढायला लावलं असल्याने भारताकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता.