इस्लामाबाद: पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव वाढल्यानं भारतानं फ्रान्सला तातडीनं राफेल लढाऊ विमानं पाठवण्याची विनंती केली. चीनच्या कुरघोड्या सुरुच असल्यानं भारतानं केलेली मागणी फ्रान्सनं लगेच पूर्ण केली. त्यानंतर काल पाच राफेल विमानांची तुकडी भारतात पोहोचली. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय हवाई दलानं राफेल विमानं हरयाणातल्या अंबाला तळावर तैनात केली आहेत. त्यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे.अंबाला हवाई तळाचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. या भागापासून चीन आणि पाकिस्तानला लक्ष्य करता येऊ शकतं. त्यामुळेच पाकिस्तानची चिंता वाढली आहे. भारत गरजेपेक्षा जास्त शस्त्रसाठा जमा करत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे. भारताला शस्त्रसाठा गोळा करण्यापासून रोखा. अन्यथा दक्षिण आशियात शस्त्रसाठा जमा करण्याची स्पर्धा सुरू होईल, असं आवाहन पाकिस्ताननं जगाला केलं आहे.फ्रान्सहून निघालेली पाच राफेल विमानं ७ हजार किलोमीटरचं अंतर कापून काल अंबालामध्ये पोहोचली. यामुळे भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य वाढलं असलं, तरी पाकिस्तानी हवाई दलाची चिंता वाढली आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल विमानं दाखल झाल्यानं पाकिस्तान बिथरला आहे. भारतात राफेल विमानं पोहोचण्यापूर्वीच पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रमुखांनी लष्कर प्रमुखांसोबत आपात्कालीन बैठक बोलावली.राफेलच्या आगमनामुळे पाकिस्तान चिंतातूर आहे. राफेल नसताना भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला होता. आता भारताच्या पराक्रमी हवाई दलात राफेल दाखल झालं आहे. इराक आणि लीबियामधील युद्धात राफेलनं धडाकेबाज कामगिरी केली आहे. पाकिस्तानी हवाई दलाकडे अमेरिकेनं दिलेली एफ-१६ लढाऊ विमानं आहेत. भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर झालेल्या चकमकीत पाकिस्ताननं हीच विमानं वापरली होती. त्यापैकी एक विमान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी मोठ्या कौशल्यानं जमीनदोस्त केलं होतं.