नवी दिल्ली-
देशाची राजधानी दिल्लीवर सत्ता असलेल्या आम आदमी पक्षाबाबत तुम्हाला माहिती असेलच. अरविंद केजरीवाल यांनी सरकार विरोधी आंदोलनांपासून सुरुवात केली. त्यानंतर राजकीय पक्ष स्थापन करत तर दिल्लीची सत्ता काबिज करत मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. आम आदमी पक्ष आता देशात विविध राज्यांमध्ये आपली ताकद देखील वाढवत आहे. पंजाबमध्येही आम आदमी पक्षानं चांगलं प्राबल्य निर्माण केलं आहे. पण तुम्हाला हे माहित्येय का की पाकिस्तानातही आता केजरीवालांच्या आम आदमी पक्षाच्याच धर्तीवर नव्या पक्षाची स्थापना झाली आहे.
पाकिस्तानात आम आदमी पक्षाची स्थापना झाली असून पाक सैन्याचे निवृत्त जनरल साद खट्टक पक्षाचं नेतृत्त्व करत आहेत. आम आदमी मूव्हमेंट पार्टी (PAAM) या नावानं साद खट्टक यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.
पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली जात आहेत. पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीच्या मुद्द्यावरुन जमात-ए-इस्लामीनं इम्रान खान सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनाची तयारी केली आहे. दरम्यान, निवृत्त जनरल साद खट्टक यांनी नव्या पक्षाची घोषणा करत देशाच्या राजकारणातून घराणेशाहीला संपुष्टात आणून सामान्य नारिकाला सत्तेवर बसवायचं हाच पक्षाचा उद्देश असल्याचं म्हटलं आहे.
कोण आहेत मेजर जनरल खट्टक?साद खट्टक हे श्रीलंकेत पाकिस्तानचे उच्चायुक्त राहिले आहेत. पाकिस्तानी सैन्यात ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी विविध ऑपरेशनल ट्रेनिंग, लीडरशीप आणि अनेक मोहिमांवर काम केलं आहे. ते बलूचिस्तानमध्ये सुरक्षा आणि दहशतवादी विरोधी मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
सामान्यांना सत्तेत आणण्याचं लक्ष्यपाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'मध्ये आलेल्या वृत्तानुसार कराची प्रेस क्लबमध्ये पक्षाच्या घोषणा करताना खट्टक यांनी जनसामान्यांना राजकारणाचा भाग बनवून सत्ते आणण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार असल्याचं म्हटलं. आमचा पक्ष सच्च्या प्रतिनिधींचा पक्ष म्हणून उदयास येईल आणि सामान्य जनतेला सत्तेत आणेल, असं खट्टक म्हणाले. "देशातील राजकारणातून घराणेशाही, सरंजामदार आणि भांडवलशाहीला नष्ट करण्याची वेळ आली आहे", असंही खट्टक म्हणाले.