Pakistan Elections, Baluchistan Bomb Blast: पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी बलुचिस्तानच्या दोन भागात बाँबस्फोट झाले. यात एकूण २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बलुचिस्तानचे कार्यवाहक माहिती मंत्री जान अचकझाई यांनी एआरवाय न्यूजला सांगितले की, पिशीन जिल्ह्यात बॉम्बस्फोट हा मोटरसायकलला जोडलेल्या IED मुळे झाला. तिथे एकूण १२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरा स्फोट बलुचिस्तान प्रांतातील किला सैफुल्ला येथे झाला. या स्फोटात १० जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे.
बलुचिस्तानमध्ये हे बॉम्बस्फोट नॅशनल असेंब्ली तसेच पाकिस्तानमधील चार प्रांतीय असेंब्लीच्या निवडणुकांच्या मतदानाच्या २४ तास आधी झाले आहेत. २२ मृतांव्यतिरिक्त अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खानोजाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. हा हल्ला कोणी आणि का केला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. घटनास्थळी सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत.
पाकिस्तानमधील राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभांच्या निवडणुका उद्या म्हणजेच ८ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. मतदान सकाळी 8 वाजता (05:00 GMT) उघडेल आणि 5 वाजता (12:00 GMT) बंद होईल. निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यास काही भागात मतदानाची वेळ वाढवून दिली जाऊ शकते.