ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी कोणत्याही वेळेची किंवा घटनेची गरज नसते. वेळ आणि क्षण कोणताही असो, काश्मीरचा मुद्दा आलाच पाहिजे. पाकिस्तान डे च्या निमित्ताने पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत 'काश्मीर लोकांच्या इच्छेप्रमाणे यावर तोडगा काढला पाहिजे', असं मत व्यक्त केलं आहे. 'काश्मीर लोकांचा संघर्ष दाबला जाऊ शकतो, मात्र त्याला संपवलं जाऊ शकत नाही', असंही ते बोलले आहेत. 'काश्मीर मुद्यासहित इतर मुद्देही चर्चेच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजेत', असंही ते बोलले आहेत.
पाकिस्तान डे च्या निमित्ताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयात ध्वजरोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतासोबत करण्यात येत असलेली चर्चेची मागणी आमचा दुबळेपणा नसून आमची ताकद आहे असं अब्दुल बसित बोलले आहेत. बासित यांनी यावेळी सांगितलं की, 'द्विपक्षीय मुद्यांवर पाकिस्तानची मुळं आंतरराष्ट्रीय कायद्याशी जोडली गेली आहेत. शांतता प्रस्थापित करणं हेच आमचं धोरण आहे. खासकरुन आशियामध्ये आम्ही शेजारी राष्ट्रांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो'.
काश्मीर मुद्याचा उल्लेख करताना बासित बोलले आहेत की, 'जिथपर्यंत जम्मू आणि काश्मीर मुद्द्याचा प्रश्न आहे, तो काश्मीरमधील लोकांच्या इच्छेप्रमाणे सोडवला गेला पाहिजे आणि असंच होईल अशी आमची आशा आहे'. 'काश्मीर लोकांचा संघर्ष दाबला जाऊ शकतो, मात्र त्याला संपवलं जाऊ शकत नाही', असंही ते बोलले. 'काश्मीर लोक जे संघर्ष करत आहेत, त्यात त्यांना यश मिळो', असं बासित यांनी म्हटलं आहे.
'शांततेत दोन्ही देशांचं हित लपलं असून शांततेच्या मार्गानेच स्थायी शांतता आणली जाऊ शकते', असं मत बासित यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.